मंगळवेढा- पारधी समाजाला न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव डी.के.साखरे यांनी दिला आहे.मंगळवेढा तहसील कार्यालयाने 2019 ला पारधी समाजातील नागरिकांना पिवळ्या शिधापत्रिका दिलेल्या आहेत; परंतु त्यांना संबंधित स्वत धान्य दुकानातून अद्याप धान्य दिले जात नाही. जातीचे दाखला मागणी अर्ज देऊनही जातीचे दाखले दिले जात नाही.
तसेच त्यांना आधार कार्ड ही मिळत नाही त्यामुळे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकाराने पारधी समाज बांधवांनी सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पासून मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
वारंवार पाठपुरावा करून ही मंगळवेढयाचे स्वप्निल रावडे यांनी त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. तहसील प्रशासनाच्या या नाकर्ते पणाचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. आज दुसर्या दिवशी ही आंदोलन सुरू असल्यामुळे त्यांना उघड्यावरती कडाक्याच्या थंडी मध्ये रात्र काढावी लागत आहे. या आंदोलनास पारधी समाजातील महिलांसह लहान लहान मुलेही बसले आहेत .
यावेळी बोलताना साखरे म्हणाले की समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे ही अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची भूमिका असून हा पक्ष नेहमी गरिबांच्या बाजूने लढणारा पक्ष आहे.
शासन प्रशासनाने आंदोलनकर्त्या पारधी समाज बांधवांची तात्काळ दखल घेऊन जिल्हा अधिकारी मिलींद शंभरकर यांनी सदर प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी साखरे यांनी केली. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पद्मिनी शेवडे, ह.भ.प. ताई महाराज मंगळवेढेकर, येताळा खरबडे,सुनील कसबे ,प्रसाद कसबे ,रेखा कसबे, रवी काळे, बबन काळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सहसंपादक-श्री मोहन भीमराव शिंदे