आर.टी.ओ. कार्यालयात ए.सी.बी.चा ट्रॅप : अधिकारी बचावला, दोघे दलाल जाळ्यात
जळगाव :(प्रतिनिधी) :-शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महिन्याभरापूर्वीचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक लाचखोरी समोर आली आहे.
खाजगी बस नावावर करण्यासाठी एका अधिकाऱ्याच्या नावे १० हजारांची लाच मागणाऱ्या दोन दलालांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव शहराजवळच असलेल्या खेडी बु॥ येथील एका एकोणीस वर्षीय तक्रारदाराने साधारण प्रवासी बस विकत घेतली असून ती बस तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर हस्तांतर करायची होती.
बस हस्तांतरच्या मोबदल्यात आर.टी.ओ. कार्यालयातील दलाल शुभम राजेंद्र चौधरी
(वय २३, व्यवसाय आर.टी.ओ. एजंट, रा. कोल्हे हिल्स गॅस गोडाऊन जवळ, जिजाऊ नगर, जळगाव ) व राम भिमराव पाटील
(वय – ३७, व्यवसाय आर.टी.ओ. एजंट, रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ, जळगाव)
यांनी आर.टी.ओ. कार्यालयातील अधिकाऱ्याचे नाव सांगत १० हजारांची लाच मागितली होती.
पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १०,००० /- रुपये लाचेची मागणी केली.
मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतःआरोपी शुभम चौधरी याने आर.टी.ओ. कार्यालय जळगावचे आवारात पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने सापळा रचला असता शुभम राजेंद्र चौधरी याला १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
पथकाने सोबत असलेल्या राम भिमराव पाटील या दलालाला देखील अटक केली आहे.
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, हवालदार अशोक अहीरे,
सुनिल पाटील, रविंद्र घुगे,
शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांनी ही कारवाई केली.