👉ओमिक्रॉनसाठी नवी स्ट्रॅटेजी, सोमवारपासून बुस्टर डोसचं बुकींग सुरू
▪️कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन व्हरिएंटचा संसर्ग जगभरात सातत्याने वाढतोय. अशात ब्रिटनने ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी अतिरिक्त उपायांची घोषणा केली. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं की, ब्रिटनमध्ये 30 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी कोरोना लसीचा बूस्टर डोस बुक करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल. Omicron वरील बूस्टर डोसच्या परिणामकारकतेबद्दल प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.रविवारी संध्याकाळी एका राष्ट्रीय प्रसारणात पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, सरकार आता महिन्याच्या अखेरीस 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा प्रयत्न करणार आहे. जानेवारीच्या अखेरीस यूकेमध्ये लसीचे तीन डोस वितरित करण्याचं लक्ष्य होतं. डिसेंबरच्या मध्यापर्यंत ओमिक्रॉन लाट येत आहे. या संदर्भात आपण सतर्क राहायला हवं. बूस्टर डोसमुळे आम्ही लोकांचं रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी करू शकतो. त्यामुळे अनेक मृत्यू टळू शकतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
👉नवीन मोटार वाहन कायदा : विनालायसेन्स सापडल्यास ५ हजार दंड
▪️वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनधारकांना चांगलेच महागात पडणार आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे (सुधारित) नवीन दराने दंडाची आकारणी होणार असून, ही वाढ दुप्पट ते चौपट करण्यात आली आहे. विनालायसेन्स वाहन चालविणार्यांना आता चक्क 5 हजारांची दंडाची पावती फाडली जाणार आहे. तसेच दंड न भरल्यास न्यायालयीन खटलेही दाखल होणार आहेत. शहर वाहतूक शाखेनेही या दंडाची अंमलबजावणी आता सुरू केली आहे.
👉...तर ओबीसी समाज मुस्लीम धर्म स्वीकारायला तयार आहे का; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
▪️गेल्या काही वर्षांमध्ये देशातील ओबीसी समाजाचं जे आर्थिक उत्थान झाले आहे, त्यांना सरकारमध्ये जे काही प्रतिनिधित्व मिळालं आहे, ते आगामी काळात टिकवायचे असल्यास या समाजाने स्वत:ची भूमिका घ्यायला शिकले पाहिजे. धर्मांध पक्षांची कास सोडून स्वतंत्रपणे वाटचाल सुरु केली पाहिजे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले.
👉एसटीचे एक लाख कामगार अंगावर आले तर काय कराल?; राज ठाकरे सरकारवर भडकले!
▪️नाशिकमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 'एसटी कर्मचारी हे या वेळी सर्व युनियन्सना बाजूला सारून एकत्र आले आहेत, त्यामुळं सरकारनं त्यांची दखल घ्यायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना इशारे दिले जात आहेत. त्याबद्दल विचारलं असता, 'जनतेनं लोकांच्या भल्यासाठी राज्य दिलं आहे, त्यांच्यावर नेत्यांनी अरेरावी करू नये. कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. शिवाय, या महत्त्वाच्या मुद्द्यावर ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत, त्या मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांनी बोलायला हव्यात. चार-चार महिने कामगारांना पगार मिळत नाहीत हे काय आहे? जे कर्मचाऱ्यांना बोलतायत त्यांच्या घरी भ्रष्टाचाराचे पैसे आले नाही तर यांचा जीव कासावीस होतो आणि कामगारांची दिवाळी पगाराविना गेली. कसं होणार? अशा परिस्थितीत कामगार असताना तुम्ही अरेरावीची भाषा करताच कशी?,' असं संतापही त्यांनी व्यक्त केला.
प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे