कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक...अखेर शिवसेनेने पॅनेल केलेच!ओबीसी राजकीय आरक्षणासाठी केंद्राची पुनर्विचार याचिकाऑनलाइन शिक्षणामुळे लिखाणाची सवय मोडली, परीक्षेसाठी अर्धा तास जास्त
👉कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक...अखेर शिवसेनेने पॅनेल केलेच!
▪️जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) करण्याच्या प्रयत्नाला अखेर मंगळवारी सुरुंग लागला. एक जागा जादा देण्यास नकार दिल्याने शिवसेनेने मंगळवारी दुपारी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर करत राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन पॅनेलची घोषणा केली. यामध्ये दोन विद्यमान संचालक खा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर आणि विद्यमान संचालक पी. जी. शिंदे यांच्या पत्नी लतिका शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय तालुका विकास सेवा संस्था गटातून भुदरगड व पन्हाळा तालुक्यातील दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पॅनेलमध्ये शिवसेनेसह शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही स्थान देण्यात आले आहे.
👉ओबीसी राजकीय आरक्षणासाठी केंद्राची पुनर्विचार याचिका
▪️स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेले निकष राज्य सरकारांकडून पूर्ण केले जात नाहीत, तोपर्यंत ओबीसींचे आरक्षण पूर्ववत (कायम) ठेवण्याची विनंती याचिकेतून केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील तत्कालीन न्यायमूर्ती के. कृष्णमूर्ती यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारला ‘ट्रिपल टेस्ट’ म्हणजे निकषांची त्रिसूत्री सांगितली होती. तिहेरी मापदंडाच्या या निवाड्यालाही केंद्र सरकार आव्हान देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेश सरकारसमोरही अडचणी उभ्या राहिल्या आहेत. इतर राज्यांसमोरही पेच निर्माण झालेला आहे. ओबीसी आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशात पुनर्विचार याचिका दाखल करून केंद्र सरकार सूचक भूमिका घेणार असल्याचे बोलले जात आहे.
👉ऑनलाइन शिक्षणामुळे लिखाणाची सवय मोडली, परीक्षेसाठी अर्धा तास जास्त
▪️दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दरवर्षी तीन तासांचा असणारा पेपर यंदा साडे तीन तासांचा असणार आहे. होय, यंदा विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास वाढवून मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी अर्धा तास वाढवून दिला आहे.
👉चिंता वाढली! इस्त्रायलमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू, हवाई वाहतूक रोखली
▪️ओमायक्रॉनने आधीच सगळ्या जगाची चिंता वाढवलेली असताना इस्त्रायलने या चिंतेत भर टाकली आहे. इस्त्रायलमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर सरकारने तात्काळ पावलं उचलत हवाई वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. याशिवाय कडक निर्बंध लावण्यासंबंधी सरकार विचार करत आहे. AP च्या वृत्तानुसार इस्त्रायलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी देशात ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाल्याचं सांगितलं आह.
प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे