राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला धक्का; रुपाली पाटील यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र', राष्ट्रवादीत प्रवेश?MNS Leader Rupali Thombre Patil Resigned
राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला धक्का; रुपाली पाटील यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र', राष्ट्रवादीत प्रवेश?
MNS Leader Rupali Thombre Patil Resigned : मनसेला धक्का, माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'.
MNS Leader Rupali Thombre Patil Resigned : मनसेच्या माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत. परंतु, राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील यांची पुढची भुमिका काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी रुपाली पाटील आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुढील तीन दिवस राज ठाकरे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी त्या राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधू शकतात, अशी सुत्रांची माहिती आहे.
सहसंपादक- मोहन भीमराव शिंदे