👉‘पंचगंगे’त मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर
📌कचरा, सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रांमधील रासायनिक पाणी थेट नदीपात्रामध्ये सोडले जात असल्याने पंचगंगा नदी अक्षरश: प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. त्याचवेळी काही लोक मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करत असल्याने नदीपात्रातील जलचरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ब्लिचिंग पावडरच्या साहाय्याने केलेली मासेमारी खवय्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. झटपट मासेमारी करण्यासाठी नदीच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून मासेमारी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. काही लोक सायंकाळी मासे मारण्यासाठी येतात. त्यावेळी ते जाळे लावण्याआधी ब्लिचिंग पावडर पाण्यात टाकत असल्याचे नदीकाठच्या शेतकर्यांनी सांगितले; तर नदीत पावडर टाकून मासे मारले जात असल्याचे रंकाळा तलावामध्ये मासेमारी करणार्या काहींनी सांगितले. काही लोकांकडून होत असलेल्या ब्लिचिंग पावडरच्या वापराचा फटका पारंपरिक मच्छीमारांना बसत आहे.
👉किल्ले पन्हाळगडावर शाही थाटात शिवजन्मोत्सव सोहळा. ‘जय भवानी... जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला गड
📌किल्ले पन्हाळगडावर छत्रपती ताराराणी महाराज यांच्या राजवाड्यासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात पारंपरिक पद्धतीने व शाही थाटात 395 वा छत्रपती शिवाजी महाराज जन्मकाळ सोहळा साजराझाला.सोहळ्यासाठी पन्हाळगडावरील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी शिवरायांचा पाळणा गायिला. ज्येष्ठ नागरिक अनंत हवळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान दिले. आरतीनंतर परंपरेप्रमाणे सुंठवडा वाटप करण्यात आले. शिवजन्मोत्सव काळ सोहळ्यात अबालवृद्ध सहभागी झाले होते.दरम्यान, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील अनेक ठिकाणी 1375 शिवजोती पन्हाळगडावरून प्रज्वलीत करून नेण्यात आल्या. रात्रभर पन्हाळगडच्या पर्यायी रस्त्यावरून शिवभक्त मावळे शिवाजी महाराजांच्या जयघोषात ज्योती घेऊन धावत होते. सर्व मावळ्यांना पन्हाळा नगरपालिकेच्या वतीने मानपत्र व श्रीफळ देण्यातआले. शिवजयंतीनिमित्त पन्हाळा युवा प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरात 86 जणांनी रक्तदान केले. संजीवन नॉलेज सिटीमध्ये शिवरायांच्या जीवनावरील पोवाड्याने शिवजयंती साजरी झाली.
👉पुणे-कोल्हापूर विद्युत रेल्वे मार्चमध्ये धावणार
शेणोली ते आदरकी या 112 किलोमीटर विद्युतीकरणाची पाहणी सुरक्षा आयुक्तांकडून येत्या दोन आठवड्यांत करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे ते कोल्हापूर दरम्यान पहिली विद्युत रेल्वे धावणार आहे. यासाठी 55 चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणासह दुहेरीकरण करण्यात येत आहे. तर मिरज-कोल्हापूर आणि मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर सध्या वापरात असलेल्या 327 किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये मिरज-कोल्हापूर दरम्यान विद्युत रेल्वे सुरू करण्यात आली होती.सध्या शेवटच्या टप्प्यातील शेणोली ते आदरकी या 112 किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. यामार्गावर यापूर्वी विद्युत चाचणी देखील घेण्यात आली आहे. याची शुक्रवारी मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी करण्यात येणार होती. परंतु ती रद्द करण्यात आली आहे.
प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे