दहावी, बारावी परीक्षेसंदर्भातील याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!एसटी संपाबाबत आता शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी! Maharashtra News
दहावी, बारावी परीक्षेसंदर्भातील याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
दहावी, बारावीच्या वार्षिक परीक्षा फिजिकल पध्दतीने घेतल्या जाऊ नयेत, अशा विनंती करणार्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि.२३) सुनावणी होणार आहे. देशातील पंधरापेक्षा जास्त राज्यांची परीक्षा मंडळे, आयसीएससी तसेच सीबीएससी मंडळाकडून फिजिकल पध्दतीने परीक्षा घेण्याची तयारी सुरु आहे, पण कोरोना संकटामुळे परीक्षा फिजिकल पध्दतीने घेऊ नयेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील याचिकांवर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सुनावणी घेणार आहे. आगामी बोर्ड परीक्षेसाठी वैकल्पिक मूल्यांकन पद्धतीचा अवलंब करावा, अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली आहे. गतवर्षी सीबीएसईसहित इतर मंडळे व राज्य मंडळांनी वैकल्पिक मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचा निकाल दिला होता. याचिकेच्या प्रती सीबीएसई बोर्डाला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
एसटी संपाबाबत आता शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी
एसटीविलनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, अशी माहिती आज राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचार्यांची विलनीकरणाची मागणी वगळता सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सर्व कर्मचार्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.एसटीचे राज्य शासनात विलिनीकरणाचा मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने यावर एक समिती गठीत केली. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विलिनीकरणाचा मुद्दा वगळता कर्मचार्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, असे सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.२८ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरु आहे. साडेतीन महिन्यांहून अधिक काळ हा संप सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे राज्यात एसटीच्या मर्यादीत फेर्या सुरु आहेत. अद्याप एसटी पूर्ण क्षमतेने सुरु झालेली नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आता सर्वांचे लक्ष शुक्रवारी उच्च न्यायालयात होणार्या सुनावणीकडे लागले आहे.
प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे