दौंडमधील व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोख रक्कम व मोबाईल लुटून नेणाऱ्या काष्टी येथील दरोडेखोरांच्या टोळीला दौंड पोलिसांनी जेरबंद केले
दौंड : दौंडमधील व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोख रक्कम व मोबाईल लुटून नेणाऱ्या काष्टी येथील दरोडेखोरांच्या टोळीला दौंड पोलिसांनी जेरबंद केले. दौंडमधील व्यापारी कांतीलाल पारसिया व त्यांच्यासोबत असणाऱ्या मुलाला येथील धनश्री बियर बारसमोर अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम दरोडेखोरांनी चोरून नेली होती. ओंकार वाघमोरे, सिद्धार्थ आकोटे, समद तांबोळी, व सागर धेंडे (सर्व रा.काष्टी, तालुका श्रीगोंदा) अशी याप्रकरणी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास येथील व्यापारी कांतीलाल पारसिया व त्यांचा मुलगा काष्टी येथील आपले दुकान बंद करून दौंडकडे येत असताना दौंड हद्दीतील सोनवडी गाव परिसरातील धनश्री बिअर बारसमोर दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा अडीच लाखांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता. तेव्हापासून या गुन्ह्याचा तपास दौंड पोलीस करीत होते.
गोपनीय बातमीदारमार्फत खबर मिळाली की, हा गुन्हा काष्टी येथील आरोपींनी केला आहे. त्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यामध्ये त्यांचे आणखीन दोघे साथीदार सामील असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार या सर्व आरोपीं विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल व इतर आरोपींचा दौंड पोलिसांकडून शोध सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रतिनिधी श्री सागर चव्हाण