पुरंदर तालुक्यात जात प्रमाणपत्र मोहिमेचे यश – जय भैरवनाथ संस्था, अध्यक्ष विजय जाधव व प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
सासवड (पुरंदर): जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यात भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या नागरिकांसाठी आयोजित जात दाखला मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मोहिमेचा मुख्य उद्देश गरजू नागरिकांना कायदेशीर जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाशी थेट संपर्क साधण्याची संधी प्रदान करणे हा होता.
कार्यक्रमात कुमारी कल्याणी सावंत व कुमारी दिव्या सावंत यांना उपविभागीय अधिकारी व प्रांत अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे आणि तहसीलदार श्री विक्रम राजपूत यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यवाहीबद्दल प्रशासनानेही कौतुक व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी संस्थेच्या पुढाकाराचे कौतुक करत, भविष्यातील सामाजिक उपक्रमांसाठी बैठक घेण्याची घोषणा केली.
कार्यक्रमात संस्थेचे सर्व समन्वयक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, महसूल नायब तहसीलदार वाघ मॅडम, मंडल अधिकारी जेजुरी बडदे, परिंचे बनसोडे, वाल्हे भिसे यांनीही सक्रिय योगदान दिले. यावेळी समाजातील मान्यवर नेते, जसे की दशरथ माळी (लमान समाज), मोहन निंबाळकर (कडकलक्ष्मी समाज), विलास पवार व प्रल्हाद गायकवाड (मरीआई समाज), विलास जगताप (नाथपंथी डवरी गोसावी समाज) उपस्थित होते.
या यशस्वी मोहिमेमुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व न्याय मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. संस्थापक अध्यक्ष विजय जाधव हे सामाजिक कार्यात निपुण असून, गरजू समाजासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविणारे आणि ग्रामीण भागातील विकासकामांसाठी परिचित आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्था भविष्यातही समाजकल्याणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय राहणार आहे.