सासवडमध्ये वीर येलोजी गोठे समाधीस्थळ वाचवण्यासाठी बेमुदत उपोषण – पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नेतृत्वाखाली लढा
सासवडमध्ये वीर येलोजी गोठे समाधीस्थळ वाचवण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण
सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) : मातंग समाजाचे व स्वराज्याचे शिलेदार वीर येलोजी गोठे यांच्या समाधीस्थळावरील अतिक्रमणाविरोधात तसेच संवर्धनाच्या मागणीसाठी नगरपरिषदेसमोर ११ सप्टेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले आहे. हे उपोषण पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नेतृत्वाखाली सुरू असून युवक राज्याध्यक्ष मनोज दादा भिसे मार्गदर्शन करीत आहेत.
उपोषणाद्वारे समाधीचे काम पूर्ण करणे, परिसरातील अतिक्रमण हटवणे आणि वीर येलोजी गोठे यांचा पुतळा उभारणे या प्रमुख मागण्या व्यक्त केल्या आहेत. समाधीस्थळाची विटंबना होत असल्याने हा प्रकार अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची मागणीही उपोषणाद्वारे केली जात आहे.
या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे अधिकृत पाठिंबा देण्यात आला आहे. युवक अध्यक्ष स्वप्निल पाटोळे व कार्याध्यक्ष कालिदास उबाळे उपाध्यक्ष सचिन कांबळे यांनी समर्थन पत्र सादर केले.
✦ मुख्य मागण्या
- समाधीस्थळावरील अतिक्रमण तातडीने हटवावे
- समाधीचे संवर्धन व विकास करावा
- वीर येलोजी गोठे यांचा पुतळा उभारावा
- समाधीस्थळाच्या विटंबनेबाबत अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत
उपोषणाला विविध संघटना, नागरिक व नेत्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ नेते विष्णू दादा भोसले (सरचिटणीस, RPI आठवले श्रमिक ब्रिगेड), नामदेव नेटके (सहसचिव, RPI पुणे जिल्हा) तसेच १८ पगड व बारा बलुतेदार-अलुतेदार संघटनांचे प्रतिनिधी राजेंद्र धोत्रे व मंगेश गायकवाड उपस्थित होते.
नागरिक व कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की –
“समाधीस्थळाचा अपमान सहन केला जाणार नाही. वीर येलोजी गोठे यांच्या स्मृतीचे संवर्धन होईपर्यंत उपोषण सुरू राहील.”
🖊 संपादक – जागरूक लोकमत समाचार