भटक्या-विमुक्त समाजाच्या हक्कासाठी भैरव क्रांती सेनेची धडपड उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा व संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
उल्हासनगर प्रतिनिधी:
भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा या हेतूने भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मा विजयानंद शर्मा आणि तहसीलदार सुरज सागर यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली
पुणे शहर आणि जिल्ह्यात भटक्या विमुक्त समाजासाठी राबवण्यात आलेली जात दाखला मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आता हीच मोहीम अंबरनाथ कल्याण उल्हासनगर परिसरात राबविण्याचा निर्धार भैरव क्रांती सेनेने केला आहे
बैठकीदरम्यान भैरव क्रांती सेनेच्या प्रदेश समिती सह अकरा समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते समाजाच्या सातत्याने स्थलांतरामुळे त्यांच्याकडे वास्तव्याचे वा जात सिद्धतेचे पुरावे नसल्याने अनेक बांधव जात प्रमाणपत्रापासून वंचित राहिले आहेत अशी माहिती श्री जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिली
त्यांनी पुणे येथे राबवण्यात आलेल्या यशस्वी मोहिमेची संपूर्ण कायदेशीर कागदपत्रे सादर करून त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही मोहीम राबविण्याची मागणी केली जात प्रमाणपत्र प्रक्रियेत शासकीय अधिकारी सहभागी होऊन सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी आदेश आणि परिपत्रक जारी करावे अशी विनंती त्यांनी केली
उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी या संदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून मार्गदर्शक सूचना देण्याचे आश्वासन दिले
या बैठकीत श्री भीमराव इंगोले यांनी अंबरनाथ येथील सर्कल मैदान परिसरात वास्तव्य करणाऱ्या सुमारे पाचशे तीस कुटुंबांबाबत शासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आणून दिले
बैठकीस उपस्थित मान्यवरांमध्ये नाथपंथी डवरी गोसावी संघटनेचे अध्यक्ष भीमराव इंगोले चित्रकथी समाजाचे नेते संजय भोसले बेलदार समाजाचे नेते दिपकराव कुमावत वासुदेव समाजाचे नेते गोविंदराव अटक वडार समाजाचे नेते पोपटराव चौगुले गवळी समाजाचे नेते दिनेश गवळी मरीआई समाजाचे नेते मोहन निंबाळकर आणि लमान समाजाचे नेते दशरथ माळी आदी मान्यवरांचा सहभाग होता
बैठकीच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की भटक्या विमुक्त शोषित वंचित कष्टकरी कलाकार आणि शेतकरी समाजाच्या न्यायहक्कासाठी भैरव क्रांती सेना महाराष्ट्रभर पोहोचणार असून प्रत्येक वंचिताला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी लढा अखंड सुरू राहील
