पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव व प्रदेश कार्यकारिणी यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
प्रतिनिधि:पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी साहेब यांच्यासमवेत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव आणि प्रदेश कार्यकारिणी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भटक्या-विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी झालेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
चर्चेला सुरुवात होताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेबांच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य हेच दर्शवत होते की भटक्या-विमुक्त समाजाचे काम कायदेशीर आणि सकारात्मक मार्गाने पूर्णत्वास जात आहे. त्यांच्या भावनेतून समाधान आणि आनंद दोन्ही झळकत होते.
जिल्हाधिकारी महोदयांनी मागील महिन्यांमध्ये जय भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या मागणीप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, अनेक भटक्या-विमुक्त समाजातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्टपणे सांगितले की पात्र असलेल्या एकाही नागरिकाला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही. महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करून हे कार्य वेगाने राबविण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
या बैठकीत नुकत्याच राबवलेल्या जात दाखला अभियान, फिरती शिधापत्रिका आणि विविध शासकीय योजनांच्या शिबिरांविषयी सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकारी यांनी जय भैरवनाथ संस्था आणि भैरव क्रांती सेनेच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.
या वेळी भैरव क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर जाधव, प्रदेश मार्गदर्शक अनिल शिंदे, सचिव दिनेश गवळी, प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव अटक,प्रदेश महिला उपाध्यक्ष गुरव मॅडम, प्रदेश प्रवक्ते पत्रकार नितीन चव्हाण आणि इतर मान्यवर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीचा समारोप समाधानकारक वातावरणात झाला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांनी भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांबाबत प्रशासन व शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या चर्चेमुळे समाजाच्या घरकुल, जात दाखला, फिरती शिधापत्रिका आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी नवा मार्ग खुला झाला आहे. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी जिल्हाधिकारी महोदयांचे मनःपूर्वक आभार मानले.