पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक वर्ग २ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे १२ फूट रुंदीचा रस्ता मंजूर करून पीडित शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान करण्यात आले आहे. ही कारवाई पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी आर्थिक तडजोडीतून अधिकाराचा गैरवापर करत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचप्रमाणे सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी खोटा स्थळ पाहणी अहवाल सादर करून संबंधित अर्जदारास मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या मागणीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकरी गेल्या ३१ दिवसांपासून पुरंदरच्या प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. मात्र पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे या संपूर्ण प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
विभागीय आयुक्त साहेब पुणे विभाग यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन, कारवाई करुन अहवाल सादर करा असे पत्र दिले आहे, तसेच जिल्हाधिकारी साहेब यांनी पुरंदरच्या प्रांत यांना कारवाई करुन अहवाल सादर करा असे लेखी पत्र दिले आहे. तरीही पुरंदरच्या प्रांत आंदोलनाकडे दुर्लक्ष करुन पळ काढीत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत व पुरंदरच्या प्रांत वर्षा लांडगे यांनी महसुली खटल्यात दिलेल्या सर्व निकालाची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी, व पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत व सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी व पुरंदरच्या प्रांत वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा जाहीर निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन देऊन पुरंदर प्रशासकी इमारत सासवड रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने निषेध आंदोलन घेण्यात येणार आहे .असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले यांनी आंदोलनाला पाठिंबा देताना दिला.
प्रतिनिधि : कालिदास उबाळे